Chat with us बोरसे काकांशी संपर्क साधा
Meet The Director - The SOLUTION
सामाजीक कार्य

बाजार समित्यांमधून २ किलो कटती व आडत बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ५ हजार कोटीचा लाभ, बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे हायकोर्टाचे निर्देश.

दि. १५ ऑगस्ट २०२४ ला देशाच्या महामहीम राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रीत प्रतिनिधी तसेच ३ देशातून कृषी क्षेत्रातील एकमेव प्रतिनिधी म्हणून निमंत्रीत या कार्यक्रमात जगातील १८० देशातील राजदूत आणि देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील २०० प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले होते, त्यात सहभाग.

जीवन प्रवास

एका सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. सगळ्या भावंडात मी मोठा होतो. लहान भावंडांना सांभाळणे आईला घरकामात मदत करणे आणि वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करणे ही माझी जबाबदारी होती. त्यात कसूर झाली तर मार बसत असे. असे माझे बालपण काहीसे कष्टात आणि शिस्तीत गेले.

किशोर अवस्थेत शाळा, अभ्यास आणि वडिलांना शेतीकामात मदत करणे हे माझे काम होते. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून नांगरणी करीत आलो होतो. वयाच्या चौदाव्या वर्षापासून मार्केटला गुळाची भरलेली बैलगाडी घेऊन जाऊन सलग पंधरा वेळा एकट्याने गूळ विक्रीचे काम केले आहे. त्या वयात ते मोठे धाडसाचे काम होते. आता असे काम कोणी करण्याची शक्यता नाही . त्यानंतर दोन वर्ष शेजारच्या गावी काकांकडे शिकायला होतो. त्यांची मोठी शेती होती. काकांचे स्वत:च्या उसाचे चार महिने गुळाचे गुऱ्हाळ चाले. बैल जोडीसह शेतीचा मोठा बाडदाना होता. मोठे एकत्र कुटुंब होते. तेथेच शेती ही माझी आवड बनली एकप्रकारे पॅशनच म्हणता येईल.

त्याकाळात अकरावी देखील पास झालो. मात्र शाळा सोडून दिली होती. मग शेती करू लागलो. सन १९७२ च्या दुष्काळात मी स्वयंस्फूर्तीने रोजगार हमीच्या कामावर भिडलो. धरणाचे काम, रोडची कामे, विहिरीचे काम आणि खडी फोडण्याचे कामही केले. शरीराने मजबूत झालो, त्यावेळी माझे वय होते वीस वर्ष. मी तारुण्याच्या उंबरठ्यावर होतो. बरोबरीचे मित्र कॉलेजला जात होते. "आधी तू शिक्षण पूर्ण करावे नंतर शेती करावी' असा त्यांचा आग्रह होता. मी कॉलेजला कला शाखेत प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी सात पैकी पाच विषयात हायेस्ट आलो. शिवाय "कमवा आणि शिका', कॉलेजच्या निवडणुका, गॅदरिंग, एनएसएस सर्वच गाजवले. कॉलेजने विशेष दखल घेऊन "पुरुषोत्तम' पुरस्कार दिला. इंग्रजी विषयात बीए केले. त्यानंतर शिक्षण संपले. आता काय करावे असा प्रश्न होता.

दुसऱ्याला मदत करता करताच नोकरीला लागलो. तालुका दूध संघात मॅनेजर झालो. संघाला पहिल्याच वर्षी "अ' वर्ग मिळाला. लग्नाचे वय झाले. पहिलीच मुलगी पाहायला गेलो. मुलीला प्रश्न विचारताना "मी नोकरी सोडणार आहे शेती करावी लागेल तयारी आहे का?' विशेष म्हणजे पलीकडून होकार आला. शुभमंगल झाले. इकडे कर्जापायी वडिलांनी तीन एकर शेती विकली होती. तरी वडील पुन्हा कर्जबाजारी झाले होते. काही जमीन गहाण पडली होती. शिवाय सावकाराचे व्याजाचे पैसे होते. भाऊ म्हणाला वडील माझे ऐकत नाहीत. तू शेतीवर ये. नोकरी सोडली आणि शेतीवर आलो. शेतीच्या कामाला भिडलो. जोडधंदा म्हणून मळणी यंत्र घेतले. दोन वर्षात वडिलांना कर्जमुक्त केले. सावकाराचे पैसे दिले. गहाण शेती सोडवली. वडिलांना किराणा मालाचे दुकान घालून दिले. (त्यांना त्यांच्या हयातीत कोणाकडे हात पसरावा लागला नाही).

जीवन संघर्ष

आई-वडील , भावंडांचे सर्वांचे संसार सोयीला लागले होते. आता त्यांना जणू काही माझी गरज उरली नव्हती. आई-वडिलांचे कान भरवले जाऊ लागले. घरात भांडणे सुरू झाली. विभक्त होण्याची भाषा सुरू झाली. खूप यातना झाल्या. अंगावरच्या कपड्यानीशी घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडले गेले. ज्या गरजेच्या वस्तू घेतल्या होत्या, त्याही हिसकावून घेतल्या गेल्या. माझ्याच हाताने घरात धान्याची पोती रचून ठेवली होती, पण मला घराबाहेर पडल्यावर संध्याकाळसाठी अन्न नव्हते. आई-वडिलांनी कसण्यासाठी अडीच एकर कोरडवाहू शेती दिली होती. शेतात मी रिकाम्या हाताने उभा होतो, जणू काही जगण्या मरण्याचा संघर्ष सुरु झाला होता. तसे जवळ काहीच नव्हते. मात्र मनात जिद्द आणि हातापायात काम करण्याची ताकद होती. दुग्ध व्यवसाय सुरू केला. पिण्याच्या पाण्याअभावी त्याची वातहात झाली. टिकाव-फावडे हाती घेतले. डोक्यावर माती वाहून जमीन समतळ केली. विहीर खोदली, पाणी लागले. टोमॅटो, द्राक्षबाग, ऊस, भाजीपाला, डाळिंब अशी सर्वच पिके घेतली. स्थिरस्थावर झालो. पण रहायला घर नव्हते. त्यात आजारपण लागले.

वयाच्या ३५ व्या वर्षी पाठीच्या मणक्याने आजारी झालो. जमिनीवर मांडी घालून बसताही येत नव्हते. बसलो तर उठता येत नव्हते. रात्र-रात्र झोप लागत नव्हती. हा आजार पुढे पंधरा वर्षे काढला. यश-अपयश पचवले. लोकांकडून झालेली निंदा - अपमानही पचवले. सुशिक्षीत शेतकरी म्हणून हिणवले गेले. तरीही संघर्ष जारी होता. मेहनत सुरूच होती. अनेक आपत्ती आल्या. नुकसानही झाले, पण मी लढत राहिलो, संघर्षालाच भिडत राहिलो.

शेतीला जोडधंदा असावा, असे पहिल्यापासूनच मला वाटत होते. तसा प्रयोग मी नोकरी सोडल्याबरोबर केला होता. १९९१ साली वयाच्या ३८ व्या वर्षी मणक्याच्या आजारामुळे शारीरिक कमजोरी लक्षात घेऊन मी ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करायचे ठरवले. त्यासाठी गावात माझ्याजवळ जागा नव्हती. म्हणून मी ऐन मोक्याच्या ठिकाणी गावाजवळ एक एकर जमीन विकत घेतली. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफिस बांधण्यासाठी इंजिनीयर कडून प्लॅन बनवून घेतला. बांधकाम करून झाले. ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू झाला. शेतकऱ्याच्या शेतातील कांदा बांधावरून थेट दूरच्या बाजारपेठेत पाठवायला सुरुवात झाली. मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली अशा बाजारपेठेत गाड्या जाऊ लागल्या. माझ्याकडे एक टेलिफोन होता. तो कधी चालायचा, कधी बंद पडायचा. कारण दूरसंचार (टेलिफोन) केंद्र माझ्यापासून आठ किलोमीटर होते. म्हणून मी गावातच असे केंद्र आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तालुक्याच्या गावी एक्स्चेंज ऑफिसमध्ये गेलो. ज्या ऑफिसरला भेटलो, ते आणि त्यांचा सहकारी एक पुस्तक चाळत होते. त्यावर ते चर्चा करीत होते. मी सुद्धा त्यांच्यात सहभागी झालो. वास्तुशास्त्राचे ते पुस्तक होते.

मला वास्तुशास्त्राने पछाडले. तसा मी शेतात झोपडीत राहत होतो. पण व्यावसायिक बांधकाम चांगले केले होते. ते मला विकायचे नव्हते, पाडायचे नव्हते. तेथे पैसा येत होता, पण टिकत नव्हता. गावातली कुत्री आणि बिनकामाचे लोक तेथे येऊन बसायचे. कधी कधी त्यांच्यात तेथेच भांडण होत असत. ती एक चावडी बनली होती. मी वैतागलो होतो. म्हणून मी वास्तुशास्त्राचा खूप अभ्यास केला. चार-पाच वर्षात मराठी, हिंदी, इंग्रजी जवळपास १०० पेक्षा अधिक पुस्तके वाचली. पण मला उत्तर एकच मिळाले. ती वास्तू व तिरपी जमीन विकून टाकणे. मी त्या वास्तुसह दहा आर जमीन १९९५ साली विकून टाकली.

दरम्यान १९९५ ला नाशिक येथे डॉ. प्रभात पोतदार यांचे हॉटेल साई पॅलेसला वास्तुशास्त्रावर एक दिवसाचे वर्कशॉप होते. माझ्या जवळच्या मित्राकडून मला माहिती मिळाली. मी स्वतः तेथे हजर राहिलो. पण त्यात वास्तूबद्दल नाविन्य फारसे नव्हते. पण एक नवी गोष्ट समजली. ती म्हणजे वास्तुशी व्यक्तीची ऊर्जा अलाइन करणे. परंतु तो विषय मला किंवा कोणालाच नीट कळाला नाही.

आणि एक चमत्कार

१९९७ साली माझ्यावर आणखी संकटे आली. तशात मी शेतीचे दोन नवीन तुकडे विकत घेतले होते. पिकात नुकसान झाले होतेे. त्यानंतर मोठी चोरी झाली आणि मी आर्थिक संकटात सापडलो. त्यात पुन्हा उरलेल्या जागेत पुन्हा नवे बांधकाम केलेले. संकटे पाठ सोडत नव्हते. संघर्ष जारी होता. आणि एक दिवस वास्तुशास्त्रावर अभ्यास करीत असताना चमत्कार झाला. माझ्या हातात दोन मॅग्नेटिक कंपास होते. त्यांच्यात दोन काटे वेगवेगळ्या दिशेने हलत होते आणि मला चुंबकीय तरंगांबाबत एक साक्षात्कार झाला. मी चमकलो आणि विचार करण्याची दिशाच बदलली.

मी वास्तुशास्त्राचे कन्सल्टिंग सुरू केले. रिझल्ट येत होते. लोक बोलवत होते. मी जात होतो. मी ज्योतिष शास्त्राचा. हस्तसामुद्रिक विषयाचा अभ्यास सुरू केला. दुरस्त पद्धतीने परीक्षा दिल्या. त्या दोन्ही विषयात दोन-दोन परीक्षा पास झालो. अर्थातच वास्तुशास्त्र, कुंडली व हस्तरेषा परीक्षण मार्गदर्शन असा व्यवसाय सुरू झाला. शेती व्यवसाय सुरूच होता.

२००४ साली मी शेती विषयावर पुस्तक लिहायला घेतले. २००५ ला ते छापून तयार झाले. एक वर्तमानपत्राच्या सहसंपादकांनी ते वाचले आणि त्याचे प्रकाशन राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्याची कल्पना त्यांनी मांडली. अर्थात माझा होकार होताच. दि. १ जुलै २००६ रोजी राज्याच्या कृषी दिनाच्या दिवशी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाने राज्याचा कृषी दिन कृषिमंत्र्यांनी साजरा केला. शेतात राबणारा शेतकरी एका रात्रीत स्टार शेतकरी झाला होतासहभागी झाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला

वास्तु कन्सल्टिंगसोबत कुंडली व हस्तरेषाशास्त्र याची प्रॅक्टिस सुरू झाली. पैसा मिळत होता. शेती सुरू होती. आपला वेळ, आपला पैसा, आपल्याकडे असलेली संसाधने समाजाच्या कामी आली पाहिजेत, अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे. त्या उद्देशाने मी फावल्या वेळात शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यही करत होतो. वर्तमानपत्रातून लिहीत होतो. शेतकऱ्यांच्या समोर शेतीचे तंत्र मांडीत होतो. भाषणे देत होतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत होतो. वर्तमानपत्रातून बातम्या येत होत्या. टीव्हीवर मुलाखती होत होत्या. बाईट प्रसारित होत होत्या. रेडीओवर मुलाखती प्रसारित होत होत्या. बाजार समित्यांमधील गैरप्रकारांना वाचा फोडली होती. हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. कृषी आणि पणन विभागाच्या बैठकांमधून राज्यस्तरावरून विचार मांडण्याची संधी मिळत होती. मी त्या संधीचे सोने केले. माझ्या कन्सल्टिंगच्या उत्पन्नाचा काही भाग मी शेतकरी चळवळीसाठी खर्च करीत होतो. माझी कार त्यासाठी वापरत होतो. माझ्या प्रयत्नातून राज्यातील कटती आणि अडत बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक ५ हजार कोटीचा फायदा झाला होता. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हायकोर्टाचा आदेश झाला होता. माझ्या "कोण होईल भगीरथ' या एका पुस्तकाने जनजागृती झाल्याने सह्याद्रीच्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी म्हणजे नार-पार दमणगंगाचे पाणी एक थेंबभर पाणीसुद्धा पूर्व भागात वळवण्याची तरतूद नसलेले निर्णय बदलून राज्य सरकारने २० हजार कोटी खर्चाच्या दहा टीएमसी पाण्याच्या उपसा जलसिंचन नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली. २४ खासदारांच्या एका संसदीय समितीसमोर २०११ साली मांडलेला पाच मिनिटांच्या भाषणाने देशातील शेतकऱ्यांना "शेतकरी सन्मान निधी' नावाने वार्षिक ६ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळू लागले हे खूप मोठे विषय आहेत. मी नम्रपणे एक गोष्टमान्य करतो. मी फार लहान माणूस आहे. पण माझ्या हाती असलेले पूर्वजांचे महान शास्त्र आणि अस्त्र माझ्या हातात आहे.

व्यक्तिगत जीवनात प्रगती होत होती माझा एक मुलगा सीए झाला. दुसरा शेती करु लागला. मी २०१२ ला नर्सरी व्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांचा विश्वास आणि प्रेम मिळाले. आपण फसवले जाणार नाही याची शेतकऱ्यांना खात्री होती. त्यामुळे व्यवसाय जोरात सुरू झाला. नवीन शेती विकत घेतली. जेथे झोपडीत राहत होतो, त्याच शेतात अत्यंत आधुनिक असे मोठे फार्महाऊस बांधले. नर्ससरीचे ऑफिस बांधले. पॉलिहाऊस बांधले. फक्त दहा वर्षात पाच कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक केली. जेथे माझ्याजवळ मोटरसायकलही नव्हती तेथे मोटारसायकलच्या जागी तीन कार आल्या. मी मणक्याचा पेशंट होतो. २००५ नंतर ते दुखणे कमी झाले. आज वयाच्या ७३ व्या वर्षी मी ठणठणीत आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व रचना, हस्तरेषा आणि कुंडलीप्रमाणे पूजापाठ आणि उपासना हे प्रयोग अर्थातच मी स्वतःवर केले आणि ते यशस्वी झाल्यानंतर मी त्याचा व्यवसाय केला.

सर्वोच कृषीरत्न पुरस्कार प्राप्त

२००५ ला मी शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले. २००६ ला मी स्टार शेतकरी झालो. २००९ ला मला कृषीभूषण पुरस्कार मिळाला. २०१९ ला राज्य सरकारचा सर्वोच्च कृषिरत्न पुरस्कार मिळाला. २०२४ मध्ये १५ ऑगस्टच्या स्वतंत्रदिनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महामहीम राष्ट्रपतींकडून मला निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात निदान १८० देशातील राजदूत आणि देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते असा तो कार्यक्रम होता. १९७२ च्या दुष्काळीत खडी फोडणारा शेतकरी २००५ पर्यंत फक्त स्वतःच्या शेतात राबणारा मी देशातील सर्वोच्च व्यवस्थेकडून दखल घेतली यासाठी माझी पात्रता आहे का? मला वाटते माझे काम युनिव्हर्सला या ब्रह्मांडातील ऊर्जेला आवडले आहे याची ही पावती आहे. राज्य सरकारचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च "कृषिरत्न' हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझी मानसिकता बदलली. आपल्या आवडी, छंद व्यवसाय आणि मिळणाऱ्या पैशापेक्षा शेतकरी वर्गात आणि समाजात आपली इमेज फार मोठी आहे, त्या प्रतिमेला जपले पाहिजे मी २०१६ पासून जवळपास वास्तुशास्त्र कन्सल्टिंगचे काम फार कमी केले होते. वयाच्या ६५ नंतर या सर्वातून निवृत्त व्हावे अशी माझी मनापासून इच्छा होती. परंतु दैवाला ते मान्य नसावे. मी नकार देत असतानाही पंधरा-वीस वर्षे माझा अनुभव घेतलेले लोक माझ्यासाठी घ्यायला गाडी पाठवू लागले. माझ्यासाठी त्यांचे निर्णय थांबवू लागले. माझ्या घरी येऊन मार्गदर्शन कराच म्हणून आग्रह करून बसू लागले. मी पैसे घेण्यास नकार दिला, तरीसुद्धा बळजबरीने पैसे ठेऊन जाऊ लागले. म्हणून मी पुन्हा एकदा आयुष्यभर या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले.

माझ्या पुस्तकाला प्रचंड मागणी

माझा जन्म एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असून, शेती करीत असताना माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय त्रासदायक होत्या, वेदनादायी होत्या. माझे वर्तन आणि कष्ट दोन्ही योग्य दिशेने असताना जो त्रास झाला त्या कोणत्याही घटनेला आणि प्रसंगाला कोणताही कार्यकारण संबंध दिसत नव्हता. "हे असे का घडत आहे' हा एकच प्रश्न मला सतावत होता. वास्तुशास्त्र, कुंडली, हस्तरेषा आणि अंकशास्त्राचा माझा अभ्यास स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या कार्यकारण संबंधाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होता. ज्याचे रूपांतर नंतर छंदात झाले. त्यानंतर ते प्रयोगात झाले आणि नंतर तो व्यवसाय बनला. सन १९९१ ते १९९५ पर्यंत हा माझा छंद होता. सन १९९५ ते १९९७ पर्यंत हा माझा संशोधनाचा विषय होता. १९९७ ते २००४ हा कालखंड माझ्यासाठी प्रयोगाचा कालखंड मानता येईल. त्यानंतर २००४ पासून पुढे आजपर्यंत मी त्याला व्यावसायिक रूप दिले आहे. पण खऱ्या अर्थाने मी व्यावसायिक नव्हतो. जमेल तसे, जमेल तेव्हा, वेळ असेल तर असा मी व्यवसाय केला. जून २०२४ पासून मात्र मी पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने कन्सल्टिंग करण्याचा निर्णय घेतला. वास्तुशास्त्र मी एकलव्याच्या पद्धतीने शिकलो. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा २०० पुस्तकांचा अभ्यास केला. त्याच्यावर प्रात्यक्षिक केले. वास्तुपरीक्षण केले. नव्या वास्तु बांधल्या आणि त्यानतर २००१ साली माझे वास्तुशास्त्राचे एक पुस्तक प्रकाशित झाले. २००५ मध्ये माझे "वैदिक वास्तुशास्त्र विज्ञान आणि व्यवहार' नावाने दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. दुसरे पुस्तक मात्र महाराष्ट्रभर फार गाजले. प्रकाशक अजूनही त्याच्या आवृत्ती काढतो आहे आणि आजही ते पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

ज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रिक विषयाचा अभ्यास मात्र मी दूरशिक्षण पद्धतीने पोस्टाद्वारे पेपर मागवून ते सोडवून केला. या दोन्ही विषयात मी दोन-दोन परीक्षा पास झालो आहे. अंकशास्त्राचा अभ्यास मी ग्राहकांची मागणी विचारात घेऊन केला. ज्याला मी एस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने डावीकडचे स्थान देतो. पण ग्राहकाने विचारले किंवा मागणी केली तर ज्ञान असावे म्हणून मी तो अभ्यास केला.

अनुभव आणि कामगिरी

वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हस्तसामुद्रिक व अंकशास्त्र हे विशेषतः भविष्यवर्तविण्यासाठी वापरले जाते. ते मानवी कल्याणासाठी फारसे वापरले जात नाही किंवा त्याला मर्यादा आहेत. वरील विषयांचे सर्व पंडित विशेष करून प्रेडिक्शन अर्थात भविष्य वर्तवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करतात. त्यात ग्राहकांना खूपच कमी फायदा होताना दिसतो. एकच व्यक्ती अनेक ज्योतिषांकडे आपली कैफियत मांडताना दिसतात. त्यांचे समाधान होताना दिसत नाही. अशा अनेक निराश लोकांना मी रिझल्ट दिलेले आहेत.

मी वेगळ्या प्रकारातला अभ्यासक आहे. मी भविष्य वर्तविण्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हस्तसामुद्रिक किंवा अंकशास्त्राचा अभ्यास केलाच नाही. तर माझ्या आयुष्यात आलेल्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी मी या शास्त्राचा अभ्यास केला. मी माझे प्रश्न सोडवले, म्हणून मी सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. मी अभ्यास केला. प्रयोग केले. २५ वर्षे व्हीजीटींग कार्डपण छापले नाहीत. ज्याला चांगला अनुभव आला, त्याने दुसऱ्याला शिफारस करावी या पद्धतीने मी वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस केली. वास्तूशास्त्राप्रमाणे पाचशे वास्तूंचे प्लॅन मी फायनल केले. मी स्वतः आर्किटेक्ट नाही, तरी मी आर्किटेक इतकेच अचूक प्लॅन बनवतो. त्या प्लॅनप्रमाणे २०० पेक्षा अधिक बंगले मी बांधले आहेत. मी अप्लाईड वास्तुशास्त्रावर अधिक काम केले. ८ हजार लोकांना वास्तु कुंडली हस्तरेषा या आधारे कन्सल्टिंग केले. आणि ९९ टक्के लोकांना रिझल्ट दिले. म्हणून मी ठामपणे बोलू शकतो, भविष्य वर्तवू शकतो आणि भविष्य बदलू शकतो किंवा भविष्य घडवू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे.

भविष्य वर्तवून प्रश्न सुटायला हवेत

भविष्य सांगितले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नाही. भविष्य सांगण्यापेक्षा ग्राहकांचे प्रश्न सुटणे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या २८ वर्षाच्या अनुभवातून सांगतो. वास्तुशास्त्र, कुंडली किंवा ज्योतिष हस्तरेषा पाहून किंवा अंकशास्त्रानुसार शंभर टक्के प्रश्न सुटतातच असे फारसे होत नाही. भविष्य वर्तविता येईल, काही प्रमाणात प्रश्न सुटतीलही, परंतु त्या कुटुंबात एक जरी व्यक्ती चुकीचा उपवास करीत असेल तर संपूर्ण घर त्यामुळे पिडीत होऊ शकते. त्या कुटुंबातील व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या विरुद्ध उपवास, उपासना पद्धती किंवा देव मूर्ती फोटो घरात असतील तर वरील चारही शास्त्र निष्क्रिय किंवा चुकीचे शाबित होतात. हजारो रुपये फी घेणारे निघून जातात व कुटुंब मात्र पिडीतच राहते. अशा अनेक कुटुंबांना मी रिझल्ट दिले आहेत. त्यामुळे भविष्य वर्तवून त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे प्रश्न सुटायला हवे असे मला वाटते.

सन १९९७ साली मला जो साक्षात्कार झाला, तो चुंबकीय तरंगांबाबत होता. याबद्दल माझे वास्तुशास्त्रातील गुरु कै. डॉ. प्रभात पोद्दार आणि माझे अध्यात्मीक गुरु परमपूज्य नरेंद्र स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने मला या विषयाचे ज्ञान झाले. वस्तुमानासोबत ऊर्जा असतेच. वस्तुमान दिसते परंतु ऊर्जा दिसत नाही. जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, आणि जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा, अंकशास्त्र हे चुंबकीय तरंगाशी संबंधित आहेत. पण त्याचबरोबर शब्दांना, मूर्तीला, प्रतिमेला, चित्रांना, उपवासाला, बोलण्याला, वर्तनाला, सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असते. थोडक्यात जिओ-बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक कनेक्टिव्हिटी किंवा चुंबकीय तरंग जे या प्रत्येक वस्तूमानाला आहे किंवा वस्तूमानाशिवाय आहे ते माझ्या कामाचे सूत्र आहे. या कनेक्टिव्हिटीच्या आधारे सोलुशन देणे ही माझी गेल्या २८ वर्षाची तपश्चर्या आहे. आणि त्याचे आठ हजार संतुष्ट ग्राहक आहेत. कोण्या एका व्यक्तीची कुंडली पाहून रिझल्ट देता येत नाही. किंवा केवळ वास्तुशास्त्र किंवा ज्योतिष शास्त्रानुसार, हस्तरेषेनुसार किंवा अंकशास्त्रानुसार प्रेडिक्शन करता येईल, पण रिझल्ट देता येतीलच असे मात्र नाही.

मी फॅमिली कन्सल्टंट आहे आणि मी फॅमीलीसाठी कन्सल्टींग करतो, एका व्यक्तीसाठी नाही. मी वास्तुशास्त्र, कुंडली, हस्तरेषा आणि अंकशास्त्र, देव-देव्हारा, उपवास-उपासना, कुलधर्म कुलाचार आणि पितृदोष या सर्वांचा एकत्रित विचार करून एका कुटुंबाला एकत्र आणि समोर बसवून चर्चा करून माहिती जाणून घेऊन उपाय देतो आणि रिझल्ट मिळतातच. अशा पद्धतीने कन्सल्टिंग करणारा कदाचित भारतात आणि जगात मी एकमेव आहे. कारण व्यक्तीपेक्षा मला संपूर्ण कुटुंब महत्वाचे वाटते .

तत्वज्ञान व दृष्टीकोन

या ब्रम्हांडात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही, असे माझे आकलन आहे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण संबंध असतोच आणि तो कार्यकारण संबंध शोधणे व त्यावर उपाय देणे ही माझी कामाची पद्धत आहे. त्यासाठी मी कुटुंब हे एक युनिट मानतो. सध्याचे ज्योतिषशास्त्र, हस्तरेषाशास्त्र आणि अंकशास्त्र फक्त एका व्यक्तीपुरते विचार करते, मी मात्र या सर्वांसाठी कुटुंब हा एक घटक माणून विचार करतो म्हणून फॅमिली कन्सल्टिंग करतो.

मोठी स्वप्न पहा आणि झेप घ्या

माणूस सर्वार्थाने कितीही मोठा होऊ शकतो, प्रगती करू शकतो असे आमचे म्हणणे आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाहीत. तुमच्यावर संकटे आली म्हणजे तुम्ही संपलात असे नाही. संकटे शिकवायला येतात, त्रास द्यायला नाही. संकटांनी तुमचे आकलन, तुमचा विचार, तुमचा दृष्टीकोन बदलतो. तुमच्या कल्पनांची व्याप्ती वाढते. खरं सांगायचं तर तुमचे आई-वडील, तुमचे नातेवाईक, तुमची पत्नी आणि मुले तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून पाठवली आहेत. तुमची संकटेही तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेली असतात. यात तुम्हाला चॉईस दिलेला नाही. तुम्ही मोठा विचार करा. जेव्हा एखादा अवकाश यान आकाशात झेपावते तेव्हा त्याच्या बुडाला आग लावावी लागते. कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला उर्जा आवश्यक असते. तुम्हाला कोणत्या दिशेने झेप घ्यायची हे तुम्हाला ठरवता येते. फार आनंदी, सुखी आयुष्यात फार मोठे परिवर्तनीय असे काही होईल असे समजू नका. कारण त्यासाठी तुमचे मन, स्वभाव, विचार आणि कृती कधीच तयार नसतात. तुमच्या बुडाला आग लागल्याशिवाय तुम्ही मोठी झेप घेऊच शकत नाही. जेवढा संघर्ष मोठा तेवढी तुमची झेप मोठी आणि त्यापेक्षा तुमचे यश मोठे असते असा विचार करा. म्हणून मी नेहमी म्हणतो, स्वप्न पहा, स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्न साकार होतातच. म्हणजे तुमची इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती आणि त्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी तुमची धडपड, कृती आणि पाठलाग तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायला मदत करते. अशा माणसांना ही सर्व शास्त्रे मदत करतात.

एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जी येथे सांगतो, मी फॅमिली कन्सल्टींग करताना कधीही नकारात्मक मांडणी करीत नाही किंवा एखादी गोष्ट समजत असूनही नकारात्मक गोष्टी सांगत नाही. फक्त सकारात्मक उपाय देतो आणि नकारात्मक गोष्टीवर मात करुन रिझल्ट देतो. जीवन सुंदर आहे पण त्यात संकटे येतात, समस्या येतात, दुःख येतात ही सर्व संकटे, समस्या, प्रश्न आणि दुःख मिटविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आम्ही म्हणजे मी शिवनाथ बोरसे ' द सोलुशन ' या अचूक व योग्य सल्ला देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुमारे ३ दशकापासून प्रयत्न करीत आहे. आपण नक्की संपर्क करा, भेटा आणि समस्यामुक्त होऊन आनंदी, सुखी - समाधानी जीवन जगा हीच सदिच्छा, अपेक्षा आणि प्रार्थना .

आपला विश्वासू
शिवनाथ बोरसे